मुंबई : कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र कवेत घेतला आहे. त्याच्याशी लढताना यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या १० हजार १२७ पदे भरण्याची कार्यवाही सरकारने सुरु केली आहे.
राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. आरोग्य विभागाच्या पाच संवर्गातील १० हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबतची त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10 हजार 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांची होणार भरती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल, असेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर