सोलापूर : कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. 6) पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुल येथे ‘नैसर्गिक शेती’विषयी कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांच्या मुख्यतः युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या दृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसार याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. श्री. देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे 200 एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये कशी परीवर्तीत केली आणि भविष्यात हा शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यभरातून सुमारे 2000 शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर https://www.youtube.com/c/Agriculture DepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था इ. ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
