करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मंदिरातील कमलाभवानी उत्सव मूर्तीच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २४ हजाराचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिली आहे.
श्री कमलाभवनी मंदिरातील कमलाभवानी उत्सव मूर्तीच्या गळ्यातून दोन सोन्याच्या वाट्या असलेले २४ हजाराचे मंगळसूत्र चोरीला गेल्याबाबत पुजारी रोहित महादेव पुजारी (वय २२) यांनी फिर्याद दिली होती. २२ ते २३ ऑगस्ट दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तत्काळ याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून यातील संशयित गुन्हेगार शोधला आहे. सागर बाळू राऊत (रा. कुंकू गल्ली, करमाळा) असे यातील संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी झालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक मनीष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, मिलींद दहिहंडे, अर्जुन गोसावी आदींनी यासाठी परीश्रम घेतले.