करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. शुक्रवारी (ता. ५) या मतदानाचा निकाल असून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये चार गामपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान झाले आहे. १४ हजार ४६ मतदारांपैकी १२ हजार १२१ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वांगी 1 ग्रामपंचायतीसाठी १०२ वर्षाच्या कृष्णात साहेबराव देशमुख यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

करमाळा तालुक्यातील वांगी १, वांगी २, वांगी ३ व वांगी ४- भिवरवाडी, सातोली, बिटरगाव, वडशिवणे व आवाटी या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली आहे. गुरुवारी (ता. ४) झालेल्या मतदानामध्ये वांगी 1 येथे 2005, वांगी २ येथे 1734, वांगी ३ येथे 2115 व वांगी ४- भिवरवाडी येथे 1015, सातोली येथे 904, बिटरगाव येथे 1158, वडशिवणे येथे 1610 व आवाटी येथे 1680 मतदारांनी हक्क बजावला आहे.

तहसीलदार समीर माने यांच्या नियंत्रणाखाली हि मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
