करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील गणेशविसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. १२५ वर्षांपासून पहिला मनाचा समजल्या जाणाऱ्या श्रीमंत राजेराव रंभा तरुण मंडळ श्री देवीचा माळ येथील बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत निघाली आहे. हत्तीची प्रतिकृती करण्यात आली असून त्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. डीजेच्या तालात गुलालाची उधळण करत श्री गणेशाच्या विसर्जनासाठी ही मिरवणूक निघाली आहे. दत्त पेठ, राशीन पेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ४.४० वाजता ही मिरवणूक आली.
श्री देवीचामाळ येथील पहिल्या मनाच्या गणेशाची मिरवणूक निघाल्यानंतर प्रमुख मंडळाच्या मिरवणूक काढल्या जातात ही परंपरा आहे. करमाळा कोरोना नंतर दोन वर्षांनी यंदा मोठ्या जल्लोषात मिरवणूका निघत आहेत. यासाठी नगरपालिकेने जयप्रकाश नारायण टाऊन हॉल येथे कृत्रिम तलाव केलेला आहे. पोलिस निरिक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
Photo : करमाळ्यातील गणेशोत्सव मंडळाकडून सामाजिक व धार्मिक विषयांवर भाष्य
करमाळा शहरात गणेशोत्सवानिमित्त मंडळांनी देखावे सादर केले धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्यावर भर देण्यात आला होता. याशिवाय सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जवलंत विषयांवर मंडळांनी भाष्य केले. दत्त पेठ तरुण मंडळाने ‘सोशल मीडियाचे फायदे व तोटे’ सजीव देखाव्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर राशीन पेठ तरुण मंडळानेही सजीव देखावा सादर स्वछता या विषयवार भाष्य केले. कानाड गल्लीतील महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाने कोरोनावर सजीव देखावा सादर केला होता.