केत्तूर (अभय माने) : करमाळा तालुक्यातील मध्य रेल्वेच्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेल्या एक्स्प्रेस गाडीतून पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरलेल्या एका 13 वर्षाच्या मुलाला शनिवारी (ता. 30) पहाटे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बेंगलोरहुन मुंबईकडे जाणारी (गाडी नंबर 11302) उद्यान एक्सप्रेस ही गाडी पारेवाडी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी पावणेपाच वाजता क्रॉसिंगसाठी थांबली. तेव्हा या गाडीतून प्रवास करणारा 13 वर्षाचा चिमुकला पाणी घेण्यासाठी स्थानकावर उतरला. तेव्हा थांबलेली एक्सप्रेस गाडी पुढे मार्गस्थ झाली. पाणी घेण्यासाठी उतरलेला मुलगा पारेवाडी स्थानकावरच राहिला. तो स्थानकावरच उभा राहून रडत होता. तेव्हा ऑन ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांनी त्याला स्टेशनकडे चौकशीसाठी आणले.

स्टेशन मास्तर शिरसट यांनी रेल्वेचे प्रबंधक यांच्याशी संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिली व कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी पुणे स्थानकावर त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून आपला मुलगा पारेवाडी येथे असल्याची सांगितले.

त्यानंतर नातेवाईक रस्तामार्गे शनिवारी (ता. 30) पहाटे 4 वाजता पारेवाडी येथे आले. ऑन ड्युटी स्टेशन मास्तर दिवाकर गव्हाडे व रेल्वे स्थानकावरील तैनात असलेले जीआरपी व आरपीएफ जवान यांचेकडून कायदेशीर कारवाई पूर्ण करून चिमुकल्यारा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

त्यावेळी त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची आभार मानून धन्यवाद दिले तसेच रेल्वेचा प्रवास सुरक्षित असल्याचा अभिप्राय व्यक्त केला.

