करमाळा (सोलापूर) : पोथरे नाका येथील हॉटेल जगदंबाच्या मागे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. धनाजी सदाशिव शिंदे (वय ३५, रा. देवळाली, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल तोफीक रझाक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ९) ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपी शिंदे याच्याविरुद्ध बेकायदा दारू विक्रीप्रकरणी कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.



