करमाळा (सोलापूर) : दारू पिण्यासाठी उसने पैसे न दिल्याचा राग मनात धरून दुकानासमोर लघुशंका केली. त्यानंतर संबंधित मालकाने संशयित आरोपीच्या आई- वडिलांकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे चिडून संशयित आरोपीने दुकानाची काच फोडून नुकसान करत दुकानमालकाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथे घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश रामदास कणसे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणामध्ये इरफान नूरमहमद इनामदार (वय 33, रा. कुंभारगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी इनामदार यांनी म्हटले आहे की, कुंभारगावमध्ये आमचे सीएससी सेंटर आहे. कुंभारगावमध्ये दुकाने सुरु असताना दुकानासमोर संशयित आरोपी कणसे हा आला. त्याने दारू पिण्यासाठी उसने पैसे मागितले. त्याला पैसे दिले नाहीत म्हणून त्याने दुकानाच्या शटरजवळ लघुशंका केली. याबाबत त्याचे आई- वडील व चुलता यांना सांगितले.

दरम्यान 29 तारखेला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरात येऊन संशयित आरोपी कणसे यांनी मला शिवीगाळ केली. राहत्या घराचा आतमध्ये हात घालून दरवाजा उघडला व जबरदस्तीने प्रवेश केला. मला शिवेगळा करून त्याने जीव मारण्याची धमकी दिली. त्याने दुकानाच्या काचेवर दगड मारला यात दुकानाचे नुकसान झाले आहे.

