करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील गेट बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. यातूनच करमाळा या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रेल्वे बोर्ड विभागीय अध्यक्ष रणजितसिंह नाईक निबांळकर यांच्या भेटीला सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गेले होते.
पारेवाडीकरांचा बदलला मार्ग! रेल्वे गेट बंदचा एसटीला फटका; नागरिकांना १२ किलोमीटरचा वळसा

खासदार नाईक निंबाळकर यांच्या भेटीमध्ये वाशिंबे ते राजुरी, वाशिंबे ते जुना पारेवाडी दोन मार्ग किलोमीटर क्रमांक 322/3 ते 322/4 या (पाण्याची टाकी ) ठिकाणचे रेल्वे गेट बंद झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ यांना गावात येण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे किलोमीटर क्रमांक ३२२/३ते३२२/४ याठिकाणी दुचाकी, छोटी चार चाकी वाहन, पायी जाण्यासाठी भूयारी मार्ग करण्याची मागणी केली.
पारेवाडी रेल्वे स्थानकावर राहिलेला 13 वर्षांचा मुलगा 12 तासाने पालकांकडे सुखरुप

मागणीची दखल घेत खासदार निंबाळकर यांनी सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक (DMR) यांना संबंधित ठीकाणी पाहणी करून नागरीकांना पायी जाण्यासाठी व दूचाकी गाड्यांसाठी संबंधित ठिकाणी नागरीकांची अडचण सोडविण्यासाठी काय करता येईल, याची पाहणी करण्याचे आदेश दिले, अशी माहिती वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य गणेश झोळ यांनी दिली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, बागल गटाचे नेते गणेश झोळ, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमोल पवार, सतिष झोळ, रणजित शिंदे, पत्रकार सुयोग झोळ उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील रेल्वे गेटबाबत खासदार निंबाळकर यांच्याशी चर्चा झाली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चिवटे यांनी सांगितले.


