करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी ते शेलगाव रस्त्यावर एकाला मोटारसायकलने जोराची धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर जेऊर येथे प्राथमिक उपचार करून बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. विलास निळकंठराव पाटील (वय ५८, रा. शेलगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणात हायगयीने मोटारसायकल चालवल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रितम सुहास रोकडे (रा. वांगी ३) असे गुन्हा दाखल झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा मुलगा अभिजित विलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे, ‘लहान भाऊ प्रशांत हा शेलगाव येथील एका पाणी बॉट्लच्या कंपनीत ऑपरेटर आहे. 29 जुलैला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वडील लहान भावाला डबा देण्यासाठी वांगीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेले. दरम्यान पावणेआठ वाजताच्या सुमारास वडिलांचा अपघात झाला असल्याचे समजले. शेलगाव- वांगी रस्त्यावरील सुशील पोटे यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला जखम झाली. त्यांच्या नाकातून रक्त येत होते.

अपघातानंतर त्यांना महेंद्र पाटील, विघ्नेश्वर पोळ, अमोल जाधव, देवानंद बेरे आदींच्या मदतीने त्यांना जेऊर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले. त्यांच्या डोक्याचे ऑपरेशन केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यामध्ये रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवल्याप्रकरणी प्रितम रोकडेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


