करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात एका खासगी क्लासमध्ये मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संबंधित क्लास चालकाला चांगलाच चोप दिला आहे. याच (सप्टेबर) महिन्यात ही घटना घडली असल्याची माहिती एका व्यक्तीने ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला दिली आहे. यामध्ये बदनामी होऊ नये म्हणून तक्रारी दिली नसल्याची चर्चा आहे. मात्र यातून क्लासमध्ये आपली मुले सुरक्षित नाहीत हे सिद्ध झाले आहे. पीडित मुलीने हा प्रकार सांगितला म्हणून ठीक पण अनेक मुले अशा घटना भीती पोटी कोणालाच सांगत नाहीत, अशी चर्चा आहे.
करमाळा शहरात सध्या अनेक खासगी क्लास आहेत. क्लासवाल्याना नेमका कोणाचा अभय आहे हा प्रश्न आहे. अनेक क्लासवाल्यांकडून नियमांची मायमल्ली केली जात आहे. काही ठिकाणी तर शिक्षक सुद्धा खासगी क्लाससाठी प्रोत्साहन देत असल्याची उदाहरणे आहेत. खासगी शाळांच्या स्पर्धेत काही सरकारी शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा स्थितीत अनेक शिक्षक सरकारी शाळेत जीव ओतून काम करत आहेत. अशा शिक्षकांना प्रोत्सहन देण्याची गरज आहे. परंतु काही ठिकाणी या उलट परस्थिती आहे. अप्रत्यक्षपणे खासगी क्लास चालकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

पहिलीपासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचे खासगी क्लास घेतले जात आहेत. सर्वत्र खासगी क्लास वाढत चालल्याने पालक सुद्धा द्विदा मनस्थितीत आहेत. खासगी क्लासमुळे मुलांचीही धावपळ होते आहे. अशा स्थितीत मुलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. अनेकदा शेजाऱ्याने क्लास लावला म्हणून आपण क्लास लावायचा अशी भावना असते. शाळेत प्रमाणिकपणे शिक्षक शिकवण्याचे काम करतात. घरी पालकाने मुलांचा थोड़ा अभ्यास घेतला तरी क्लासची गरज पडणार नाही. मात्र अनेक चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्लासमध्ये मुलाना पाठवले जात आहे.

करमाळा शहरात अनेक ठिकाणी खासगी क्लास आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत (शाळेची वेळ सोडून) हे क्लास सुरु असतात. असाच एका क्लासमध्ये गेलेल्या मुलीची क्लास चालकानेच नको त्या ठिकाणी स्पर्श करून छेड काढली असल्याचे समजत आहे. या प्रकारानंतर पीडित मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी संबंधित क्लास चालकाला चोप दिला आहे. या प्रकारची कोठे वाचता केली तर पुन्हा चोप दिला जाईल, असे सांगितले.

संबंधित पालकांनी बदनामी नको म्हणून हा प्रकार सहन केला आहे. मात्र संबंधित शिक्षकाने केलेल्या या प्रकारचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालकांनी असे प्रकार होऊ नयेत म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.