करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेच्या पांडे गटातून काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी. पक्ष व गट पहाण्यापेक्षा सर्वांच्या उपयोगी पडणारा आणि सुख- दुःखात सहभागी होणाऱ्याला प्राधान्य देण्यात यावे. यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे योग्य उमेदवार आहेत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आळजापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच ऍड. नितीन गपाट यांनी केली आहे.

ऍड. गपाट म्हणाले, मी बागल गटाचा कट्टर कार्यकर्ता आहे. परंतु गटाची भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. संतोष वारे हे देखील आपल्यातीलच आहेत. त्यांच्या कामाची दखल घेता नक्कीच सर्वसामान्य माणसन त्यांचा विचार करणे योग्य आहे. तालुक्याच्या राजकारणात कोणता गट कोणाबरोबर एकत्र येईल. हे पहावे लागणार आहे. मात्र बागल आणि पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे, ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. तालुक्यात विकासासाठी बागल व पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, असे सांगतानाच पांडे गट सर्वसाधारण असल्याने येथे उमेदवारी कोणाला दिली जाऊ शकते हे पहावे लागणार आहे.

मात्र गटाच्या विकासाच्या दृष्टीने वारे यांना उमेदवारी देण्यात यावी. त्यांचा जनसंपर्क, या भागातील गावांमध्ये केलेली कामे याचा विचार उमेदवारी देताना करावा, असे ऍड. गपाट म्हणाले आहेत. पांडे गटात रावगाव व पांडे हे पंचायत समितीचे गण आहेत. पांडे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर रावगाव गण सर्वसाधारण आहे. वारे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम केलेले आहे. त्यांच्या पत्नी राणी वारे या गेल्यावेळी जिल्हा परिषदेला सदस्य होत्या. त्यातूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार करणे अवश्यक आहे, असे ऍड. गपाट यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. या आरक्षणविरुद्ध आक्षेप घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २) मुदत देण्यात आली आहे.
(sponsored)
