करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकाल लागलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बागल, पाटील, शिंदे, जगताप व मोहिते पाटील गटांकडून दावे केले जात आहेत. मात्र बागल गटाला ऊर्जा देणारा हा निकाल लागला असल्याचे समजले जात आहे. दुसरीकडे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटासाठी विचार करायला लावणारा व आमदार संजयमामा शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. जगताप गटानेही त्यांच्या जागा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

करमाळा तालुक्यातील आवाटी, सातोली, वडशिवणे, बिटरगाव, वांगी नंबर १, वांगी नंबर २, वांगी नंबर ३ व वांगी नंबर ४- भिवरवाडी या आठ ग्रामपंचायतीमध्ये ५९ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये काही ठिकाणी जगताप, बागल व पाटील या गटांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर एकत्र लढत होते. तर काही ठिकाणी आमदार शिंदे व बागल गटाचे कार्यकर्ते एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते. काही ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते एकत्र निवडणूक रिंगणात होते. स्थानिक पातळीवर सोईनुसार तडजोड करून या निवडणुकीत कार्यकर्ते एकत्र आले होते. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये चार ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. तेथे पहिल्यांदाच निवडणूक झालेली आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली. निकालानंतर कार्यकर्ते जल्लोष करत बाहेर पडत होते. प्रभाव झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र निराशा जाणवत होती. निवडणूक झालेल्या सातोली ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी निवडणूक झाली. येथे मोहिते पाटील समर्थक शंकररावबापू साळुंखे यांच्या विचाराच्या सातोली ग्रामविकास आघाडी पॅनेलविरुद्ध शिंदे गटाचे कार्यकर्ते समविचारी आघाडी करून एकत्र रिंगणात उतरले होते. त्यात साळुंखे यांच्या पॅनेलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

बागल गटाचा दावा असलेल्या ग्रामपंचायती
वडशिवणे ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाने सात जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथे पराभव झालेल्या दोन जागांपैकी एक जागा एका मताने तर दुसरी जागा तीन मताने गेली आहे. येथे जगताप विरुद्ध बागल गटाचे कार्यकर्ते यांच्यात सामना झाला. त्यात जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. वांगी नंबर ४ व भिवरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाचे वर्चस्व राहीले आहे. बागल गटाकडून येथे डॉ. भाऊसाहेब शेळके, परशुराम जाधव, अमरसिह अरकीले, गायत्री शेळके, धनसिंग शेटे हे विजयी झाले आहेत. बिटरगाव या ग्रामपंचायतीवरही बागल गटाने दावा केला आहे.

पाटील गटाने दावा केलेल्या ग्रामपंचायती
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बिटरगाव येथे पाटील गटाचे महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलमध्ये प्रभाग क्रमांक २, प्रभाग क्रमांक ३ व प्रभाग क्रमांक १ मध्ये पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या बरोबर आवाटी ग्रामपंचायतीमध्येही सत्ता आली असल्याचा दावा कर्यकर्ते करत आहेत. येथे पाटील, बागल व जगताप गटाचे कार्यकर्ते एकत्र लढत होते. याबाबत पाटील गटाच्या कार्यालयाकडून अद्याप माहिती समजलेली नाही. वांगी नंबर 2 येथे पाटील गटाचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाला असल्याचा दावा पाटील समर्थक विशाल तकीक पाटील यांनी ‘काय सांगता’कडे केला आहे.
शिंदे गटाने दावा केलेल्या ग्रामपंचायती
आमदार शिंदे गटाकडून वांगी नंबर १ येथे नीलकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनल देण्यात आला होता. त्यात ११ पैकी ७ जागांवर विजयी मिळवण्यात आला आहे. तर वांगी नंबर २ येथे ९ जागांपैकी ६ जागांवर विजयी मिळवण्यात आला आहे. आठ ग्रामपंचायतीच्या ५९ जागांपैकी ३० जगावर शिंदे गटाने दावा केला आहे.
जगताप गटाचा दावा असलेल्या ग्रामपंचायती
जगताप गटाने आवाटी व वांगी नंबर ३ येथील ग्रामपंचायतीच्या जागांवर दावा केला आहे. याबाबत मात्र अधिकृत माहिती कार्यालयाकडून आलेली नाही. निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.