करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आवाटी येथे विजेचे उपकेंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी 2 कोटी 37 लाख निधी मंजूर झाला असून 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे. या उपकेंद्रामुळे कोळगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.

आमदार शिंदे म्हणाले, 2 वर्षापासून कोळगाव धरण 100 टक्के भरत आहे. त्यामुळे या परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस व केळीची लागवड झाली आहे. या भागात विजेच्या अतिरिक्त भारामुळे पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नव्हता. या परिसरात विजेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे नागरिकांची नवीन वीज उपकेंद्राची मागणी केली होती. या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे.

कमी दाबाने मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील शेतीवर परिणाम होत होता. प्रत्यक्षात 4 तासच वीज पुरवठा येथे केला जात होता. आता नवीन उपकेंद्रामुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे. कोळगाव उपकेंद्रावर गौंडरे, आवाटी, नेरले, निमगाव ह, हिवरे, कोळगाव असा लोड होता. आता नवीन उपकेंद्रामुळे कोळगाववरील दाब कमी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने म्हणजे 8 तास वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
