करमाळा (सोलापूर) : येथील सब जेलमध्ये अटकेत असलेल्या एका संशयित आरोपीने बाथरूमच्या पायरीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याविरुद्ध कलम ३०९ प्रमाणे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकणात जेलर समीर पटेल यांनी फिर्याद दिली आहे. चिंकू उर्फ सयद्या उर्फ सय्यद टरलिंग काळे (वय २६, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

करमाळा सब जेलमध्ये चार लॉकप रूम आहेत. तीन लॉकप रूममध्ये न्यायालयीन कोठडीतील ४३ पुरुष संशयित गुन्हेगार आहेत. तर एका रूममध्ये दोन महिला संशयित गुन्हेगार आहेत. असे ४५ जण अटकेत आहेत. त्यात कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला काळे एक आहे. त्याने ‘मला दरोड्याच्या गुन्ह्यात घेणार आहेत. मी मरतो, आत्महत्या करतो, मी जिवंत राहणार नाही असे म्हणून सब जेलमधील बाथरूमच्या पायरीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

७ तारखेला सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास त्याने हा प्रयत्न केला. काळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या रूममध्ये १३ संशयित गुन्हेगार होते. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. इतर गुन्ह्यात वर्ग करू नये म्हणून त्याने हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

