मंत्री सावंत यांच्या मदतीने ‘आदिनाथ’चा पहिला अंक संपला! दुसऱ्या अंकात पाटील व बागल नेमकं काय करतील?

Bagal- Patil- Savant

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना या वर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरु कार्याचाच असा आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांचा निर्धार आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून त्यांनी याची सुरुवात केली होती. मध्यंतरीचा कालावधी सोडून पुन्हा ते नव्या जोमाने कामाला लागले आहेत. सुरुवातीला त्यांना सहीचे अधिकार द्यावेत अशी मागणी होती. आता त्यांना कागदोपत्री कोणताही अधिकार नसला तरी त्यांचे प्रमाणिक प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पाटील आणि बागल गटाची त्यांना मदत असल्याचे सांगितले जाते. मात्र आता डांगे यांनी सुरु केलेल्या गाव भेट दौऱ्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते त्यांना कशी मदत करतात हे पहावे लागणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोच्या हातात गेलेला आदिनाथ कारखाना शेवटच्या क्षणी ताब्यात ठेवण्यात संचालक मंडळाला (राज्यात सत्तांतर झाल्यामुळे) यश आले. माजी आमदार नारायण पाटील यांनी यामध्ये ऐनवेळी उडी घेतली आणि सर्व चित्र बदलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, आमदार राम शिंदे व मोहिते पाटील यांनी मदत केली असल्याचे पाटील जाहीरपणे सांगत आहेत. हे सांगतानाच सावंत यांच्या सूचनेनुसार बागल व पाटील हे आदिनाथसाठी एकत्र काम करणार आहेत, असेही ते सांगत आहेत. मात्र बागल याबाबत जाहीरपणे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

या वर्षी कारखाना सुरु होणे हे तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. राजकारण न करता सर्व गटाच्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे असे आवाहन डांगे करत आहेत. त्यातूनच गेल्या आठवड्यात कारखान्यावर कार्यकर्त्यांची एक बैठक झाली होती. तेव्हा माजी आमदार पाटील हे स्वतः उपस्थित होते. या बैठकीला बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या उपस्थित नव्हत्या. मात्र त्यानंतर त्यांनी कारखान्याची पहाणी केली होती. त्यानंतरही त्यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केलेली नाही. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयन्त केला मात्र त्यांनी फोन उचललेला नाही. कारखाना कोण चालवतंय यापेक्षा हेवे- दावे बाजूला ठेऊन कारखाना सुरु करण्यासाठी प्रत्येकाने मदत करणे आवश्यक आहे, असे कार्यकर्ते म्हणत आहेत. माजी आमदार पाटील हे जाहीरपणे आदिनाथबाबत बोलत असताना बागल शांत का आहेत? असा प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.

आदिनाथ कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात रहावा यासाठी मंत्री सावंत यांनी सुमारे ११ कोटी ७० लाख रुपये दिले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत हे पैसे भरल्यामुळे पवार यांच्या ताब्यात जाण्यापासून कारखाना वाचाला. मात्र कारखाना सुरु करण्यासाठी व पूर्ण गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणखी पैशांची गरज आहे. त्यासाठी आता गाव भेट दौरा करून सभासदांमध्ये याची माहिती देऊन मदत देण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी बागल व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मदत करणे आवश्यक आहे. मात्र गटाच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत सूचना दिल्या नाही तर हा दौरा यशस्वी होईल का? हा प्रश्न आहे. गटाच्या प्रमुख नेत्यांनी देखील या दौऱ्यात उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र तसे होईल का नाही? हे पहावे लागणार आहे.

‘ओटीएस’ करून मंत्री सावंत यांच्यामुळे संचालक मंडळ पहिली लढाई जिंकले आहे. मात्र आता कारखाना सुरु करून हंगाम यशस्वी करणे येथे खरी कसोटी लागणार आहे. कारण पैशांशिवाय यामध्ये काहीच होऊ शकत नाही. हे पैसे कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. बँकेकडून मदत घेईची म्हटलं तरी वरिष्ठ पातळीवरून सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी सहकार्य केले तरी दोन्ही गटाचे संचालक व्यवस्थित एकत्रित काम करतील का? हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *