करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथील कृषी पदवीधर तरूणाने केळी पिकात आंतरपीक घेत कोबीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. तीन एकरमध्ये त्यांना सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. रोहीत अप्पासाहेब लबडे यांनी तीन वर्षांपूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. सुरवातीला त्यांनी नोकरीचा प्रयत्न केला परंतु आवडीचे काम व अपेक्षित पगार मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गावातच कृषी सेवा केंद्र सुरू केले. वडील व चुलते आपल्या वडीलोपार्जीत शेतात ऊस व केळी पिके घेत असत. यामध्ये काही बदल करावा, असे रोहीतला वाटत होते. परंतु त्यांचा ठाम नकार होता.
कृषी केंद्राच्या माध्यमातून गावातील काही शेतकऱ्यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली विविध पिके घेऊन यामध्ये भरघोस उत्पादन घेऊ लागले हे पाहिल्यानंतर त्यांनी तीन एकर क्षेत्रावर त्याला त्याच्या मनाप्रमाणे पिक घेण्याची मुभा दिली. यानंतर रोहितने तीन एकरवर केळी पिकचे घेऊन यामध्ये कोबीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. जुनमध्ये लागवड करण्यासाठी दोन्ही पिकाच्या रोपांचे बुकिंग केले. कोबीची तीन एकराची रोपे आली परंतु केळीची फक्त दोन एकराची रोपे उपलब्ध झाली. या दोन एकरात आंतरपीक व उरलेला कोबीच्या रोपांची सरळ सरीवर लागवड केली.

त्याचा कृषी पदवीधर मित्र सुमीत पाटील या दोघांच्या विचाराने गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करून अडीच महिन्यांत भरघोस पिक उभे केले. ६० टन उत्पादन अपेक्षित असून सध्या पुणे, सोलापूर व स्थानिक मार्केटमध्ये त्याची विक्री करून सरासरी १८ रूपये दर मिळवत अडीच महिन्यात सात ते साडेसात लाखांचे उत्पन्न सहज मिळण्याचा विश्वास त्याला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना उजनी धरणामुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. परंतु ऊसाशिवाय वेगळी पिके घेत नाहीत.

भरघोस उत्पादन व उत्पन्न मिळवण्यासाठी बाजारपेठेचा अंदाज घेत वेगवेगळी पिकांचे प्रयोग करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतील असे त्याला वाटते. त्याच्या यशस्वी कोबी शेतीचा प्रयोगामुळे परिसरातील तरूण शेतकरी आवर्जून त्याच्याकडून माहीती घेत असून त्याचे विविध प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

रोहीत लबडे म्हणाले, शेतीमध्ये उत्पादीत मालाला भाव मिळणे शेतकऱ्याच्या हातात नाही. मात्र बाजारपेठेचा अंदाज घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य नियोजनासह भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्यास नक्की फायदा होतो.