करमाळा (सोलापूर) : मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातून साधारण १२०० शिवसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवीण कटारिया यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा दसरा मेळावा होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला मोठी गर्दी होईल, असा अंदाज आहे.

करमाळा येथून जास्तीतजास्त शिवसैनिकांनी मेळाव्याला यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते रेल्वेने मुंबईकडे जाणार आहेत. या मेळाव्याला जाण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत, असे कटारिया यांनी सांगितले आहे. ‘शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा’ हे एक समीकरण आहे. या मेळाव्यात ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त शिवसैनिक येथील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात असल्याचे ते म्हणले आहेत.

