सोलापूर : येथील समाज कल्याणचे सहायक आयुक्त कार्यालयाचे शासकीय वाहन टाटा सुमो (वाहनाचे मॉडेल – टाटा सुमो Victa CX, क्षमता- ९, नोंदणी दिनांक – २९ मे २०१०) हे शासकीय वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्याचा कालावधी १० वर्षापेक्षा जास्त झालेला असल्याने शासन निर्णयानुसार वाहन निरुपयोगी ठरवून निर्लेखित करण्यात आलेले आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी शासकीय वाहनाचे मूल्यांकन अंदाजित 1 लाख 25 हजार ते 1 लाख 35 हजार इतके असल्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार शासकीय वाहन टाटा सुमो क्रमांक एम.एच.११ एबी- ०१८५ या शासकीय वाहनाचे दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे लिलाव पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे. इच्छुकांनी लिलावास उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बरेली येथे 12 ते 24 सप्टेंबरला अग्नीवीर सैन्य भरती मेळावा
सोलापूर : युनिट हेडकॉर्टर कोट्यातून अग्नीवीर जनरल ड्युटी व क्लर्क आणि ट्रेडसमन या पदासाठी जाट रेजिमेंट सेंटर, बरेली येथे 12 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 यादरम्यान झालेला असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर दुरध्वनी क्रमांक 0217-2731035 वर संपर्क करावा. भरतीबाबतची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.

जीडीसी अँड ए व सीएचएमची गुणपत्रके घेऊन जाण्याचे आवाहन
सोलापुर : ऑक्टोंबर २०२१ मध्ये झालेल्या जीडीसी अँड ए व सीएचएम परीक्षा २०२० चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे. या परिक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थींची गुणपत्रके व प्रमाणपत्रे परिक्षार्थ्याना वितरित करणेसाठी संबंधित केंद्राचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत. परिक्षार्थीनी एका महिन्याचे कालावधीत त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित केंद्रावरून स्वतः घेऊन जावे. इतर तपशिलासाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in मधील महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी. ॲण्ड ए. मंडळ या संकेतस्थळाचे अवलोकन करावे, असे आवाहन जी.डी.सी. ॲण्ड ए. चे सचिव तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी केले आहे.

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सांगोला शहरात प्रभात फेरी
सोलापुर : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे. सांगोला शहरातील नागरिकांमध्ये या मोहिमेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सांगोला तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे. प्रभात फेरी ही विदयामंदीर प्रशाला सांगोला ते वासुद चौक सांगोला पर्यंत काढणेत आली. या प्रभात फेरी मध्ये नायब तहसिलदार किशोर बडवे, गट विकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे व अन्य तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश खंड ३ चा वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांचेकडून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर या कार्यालयास स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश पश्चिम महाराष्ट्र खंड ३ या चरित्र विषयक संदर्भ ग्रंथाच्या दोन प्रती प्राप्त झाल्या असून या खंडात वाचकांसाठी कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देण्यात आली आहे. हा ग्रंथ वाचनासाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिध्देश्वर पेठ, पहीला मजला, सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत वाचकांनी वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
