करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने पाठींबा काढल्यानंतर त्यांची लढत ही एकाकी झाली होती. ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत हे प्रचारासाठी आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्यासाठी स्वतः शरद पवार व जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी सभा घेतली होती.
शिंदे हे अपक्ष रिंगणात उतरले आणि जगताप व सावंत यांनी पाठींबा काढल्यानंतर ते एकटे मैदानात होते. बबनदादा शिंदे यांनी त्यांच्यासाठी एक सभा घेतली होती. मात्र त्यानंतर चंद्रकांत सरडे, विलास पाटील, सुहास गलांडे, चंद्रहास निमगिरे, विलास राऊत, सुजित बागल, कन्हैयालाल देवी, गणेश चिवटे, विवेक येवले, नागेश कांबळे, संजय घोलप यांच्याशिवाय डॉ. विकास वीर, अमोल काळदाते, सरपंच रवींद्र वळेकर आदींनी सभा गाजवल्या. सर्व नवख्या चेहऱ्यांना घेऊन ते मैदानात उतरले. त्यांना मिळालेले मतदान हे गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. लहान लहान गटांना घेऊन त्यांनी निवडणूक लढवली. शेवटी अण्णा पवार व नानासाहेब लोकरे यांनीही त्यांच्या गटाला पाठींबा दिला. त्यामुळे उत्साह वाढत गेला.