करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बंद पडलेला आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत साडे येथील माजी सरपंच दत्तात्रय जाधव यांनी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्याकडे रोख १ लाख रुपये दिले आहेत. रविवारी (ता. २८) सकाळी माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत या हंगामात कारखाना सुरु करण्यासाठी अभिषेक करण्यात आला. तेव्हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आदिनाथ कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये बरेच राजकारण झाले आहे. सध्या बारामती ऍग्रो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व कारखान्याचे संचालक मंडळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. रविवारी कारखान्यावर झालेल्या अभिषेकावेळी प्राचार्य जयप्रकाश बिले, पाटील गटाचे देवानंद बागल, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर, डॉ. वसंत पुंडे, झरेचे सरपंच भारत मोरे, ज्येष्ठ नेते भीमराव घाडगे यांच्यासह अनेक कामगार व सभासद उपस्थित होते.

प्राचार्य बिले म्हणाले, कारखाना सुरु करण्यासाठी डांगे यांच्यावर विश्वास टाकला आहे. यामध्ये राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना सुरु कसा होईल, याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करताना सर्वानी कारखान्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे. यावेळी डांगे यांनी मनोगत व्यक्त करत कारखाना सुरु करण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती सांगितली. डॉ. पुंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

देवानंद बागल म्हणाले, मदत जाहीर करताना जेवढे शक्य आहे तेवढीच जाहीर करा. जास्त आकडे सांगून उपयोग होणार नाही. मदत जाहीर केल्यानंतर ती लगेच संबंधीतांकडे देण्याचा प्रयत्न करा. त्यातुन कारखाना सुरु करण्यासाठी सर्वांचा हातभार लागणार आहे. यावेळी त्यांनी कारखाना सुरु करण्यासाठी पाटील यांनी कसे प्रयत्न केले हेही सांगितले.

जाधव यांनी मदत जाहीर केल्यानंतर लगेच काहीवेळात तेथेच रक्कम दिली. फक्त मदत जाहीर करून चालणार नाही तर सर्वांनी ती लगेच देण्याचा प्रयत्न करावा असे सांगतानाच फक्त आदिनाथ कारखाना सुरु व्हावा, या हेतूने आपण मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.