करमाळा (सोलापूर) : खासगी क्लास चालकाने शिकवणीसाठी आलेल्या मुलीचे छेड काढल्याचा प्रकार समजताच करमाळा शहर व तालुक्यातील नागिरक आक्रमक झाले आहेत. करमाळा पोलिस ठाण्यात एकत्र येत सकल मराठा समाजाच्या लेटरपॅडवर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २०) निवेदन दिले आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना याबाबत निवेदन दिले असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी व सर्व क्लास चालकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करा, अशी मागणी केली आहे. यावेळी तहसीलदार समीर माने यांनी मी स्वतः यामध्ये लक्ष घालून त्वरित संबंधितांची बैठक घेतो, असे आश्वासन दिले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे यांनी निवेदन स्वीकारले आहे.
करमाळा शहरात एका खासगी क्लासमध्ये मुलीची छेड!
करमाळा शहरात वेताळ पेठ येथील पानसांडे नावाच्या खासगी क्लासमध्ये मुलीची छेड काढली असल्याची तक्रार समोर आली आहे. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संबंधित क्लास चालकाला चांगलाच चोप दिला. या प्रकारावरून खासगी क्लासमध्ये आपली मुले सुरक्षित नाहीत हे सिद्ध झाले आहे. पीडित मुलीने हा प्रकार सांगितला म्हणून ठीक पण अनेक मुले अशा घटना भीती पोटी कोणालाच सांगत नाहीत, अशी चर्चा आहे.

करमाळा शहरात सध्या अनेक खासगी क्लास आहेत. क्लासवाल्याना नेमका कोणाचा अभय आहे हा प्रश्न आहे. अनेक क्लासवाल्यांकडून नियमांची मायमल्ली केली जात आहे. काही ठिकाणी तर शिक्षक सुद्धा खासगी क्लाससाठी प्रोत्साहन देत असल्याची उदाहरणे आहेत. खासगी शाळांच्या स्पर्धेत काही सरकारी शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा स्थितीत अनेक शिक्षक सरकारी शाळेत जीव ओतून काम करत आहेत. अशा शिक्षकांना प्रोत्सहन देण्याची गरज आहे. परंतु काही ठिकाणी या उलट परस्थिती आहे. अप्रत्यक्षपणे खासगी क्लास चालकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

पहिलीपासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचे खासगी क्लास घेतले जात आहेत. सर्वत्र खासगी क्लास वाढत चालल्याने पालक सुद्धा द्विदा मनस्थितीत आहेत. खासगी क्लासमुळे मुलांचीही धावपळ होते आहे. अशा स्थितीत मुलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. अनेकदा शेजाऱ्याने क्लास लावला म्हणून आपण क्लास लावायचा अशी भावना असते. शाळेत प्रमाणिकपणे शिक्षक शिकवण्याचे काम करतात. घरी पालकाने मुलांचा थोड़ा अभ्यास घेतला तरी क्लासची गरज पडणार नाही. मात्र अनेक चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्लासमध्ये मुलाना पाठवले जात आहे.

करमाळा शहरात अनेक ठिकाणी खासगी क्लास आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत (शाळेची वेळ सोडून) हे क्लास सुरु असतात. या क्लासच्या वेळेचे बंधन घालून देण्यात यावे, क्लासमध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था कशी आहे., पार्किंगची सुविधी, स्वछतागृह अशा सुविधा आहेत का? आदींची व्यवस्था आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे.