आज अचानक सायंकाळी पाचच्या सुमारस माझे कॉलेजातील स्नेही प्रा. गौतम खरात सर घरी आले आणि त्यांनी नागराज मंजुळे जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील त्याच्या निवासस्थानी असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली आणि मग आम्ही लगेचच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जेऊरला निघालो.. सोबत आमचे आणखी एक स्नेही प्रा. नितीन तळपाडे यांना बरोबर घेतले.. फॅन्ड्री, सैराट आणि झुंड या चित्रपटांमध्ये भूमिका केलेले जेऊरस्थित प्रा. संजय चौधरी यांना आम्ही नागराजला भेटण्यासाठी येत असल्याची वार्ता दिली.. चौधरी सरांनी लगोलग ही वार्ता नागराजला कळवली आणि नागराजने आम्हाला त्याचे बालमित्र नागेश झांजुर्णे यांच्या मोबाईल फोनच्या शोरूममध्ये भेटू असे कळवले आणि आम्ही नागराजच्या भेटीच्या ओढीने काही मिनिटांतच झांजुर्णे यांची शोरूम गाठली..
साधरणतः पाच दहा मिनिटात नागराज आमच्या समोर आला आणि त्याला पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.. क्षेमकुशल विचारून झाले, वढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. आणि मग ज्या आमच्या गप्पा सुरु झाल्या त्या अखंड, प्रचंड आणि उदंड अशा अक्षय आनंदाची अनुभूती देत दीड दोन तास चालू राहिल्या.. चर्चेची सुरुवात डॉ प्रदीप आवटे यांनी नागराज वर नुकत्याच केलेल्या कवितेने झाली.. डॉक्टरांनी केलेल्या कवितेवर नागराज आणि आम्ही सर्वच बेहद्द खुश..

झुंडची पडद्यामागची स्टोरी, अण्णा भाऊ साठे यांचे माणूस आणि साहित्यिक म्हणून नागराजला भावलेले वेगळेपण आणि मोठेपण, बहिणाबाई चौधरी यांच्या भाषेची वैशिष्टये, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, नरवीर फकिरा राणोजी साठे, गणपतीची वर्गणी गोळा करत फिरणारी किशोर वयीन मुले,माध्यमांतर, सिनेमा सृष्टीतील माणूसपण जपणारी माणसं आणि सर्वसामान्य जीवनात बेगडीपणाने वावरणारी माणसं.. अशा कितीतरी विषयांवर नागराज सहज आणि मार्मिक बोलला.. बोलता बोलता पवसाच्या निबंधामधला मेघराज दिसला, लगेच त्याची आमच्याशी ओळख करून दिली..

भारतीय सिनेसृष्टीमध्ये पटकथा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सर्वोच्च स्थानावर आणि चाहत्यांच्या हृदयसिंसनावर विराज मान झालेला महानायक नागराज इतक्या सहज आणि साधेपणाने आमच्याशी बोलतांना माझ्या संज्ञाप्रवाहामधे तरंग उमटत होते.. भरताच्या नाट्यशास्त्राचे.. नागराजच्या बोलण्याच्या ओघात तो नट, नायक, नायिका, प्रेक्षक इत्यादी घटकांविषयी जी मते व्यक्त करत होता त्याचा नेणिवेच्या पातळीवर नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र, अंतोनी आर्तो याचे थिएटर ऑफ क्रुएल्टी यांच्याशी संबंध असल्याचे प्रकर्षाने स्ट्राईक होत होते.. असोशिएशन ऑफ आयडिया किंवा कल्पना साहचर्य म्हणतात ते हेच असावे..भविष्यात जेव्हा चित्रपटाचे नाट्यशास्त्र लिहिले जाईल तेव्हा ते नागराजच्या कलाकर्तृत्वाने व्यापलेले असेल..

या सर्व चर्चांमधला क्लायमॅक्स होता.. संग्राम बापू हजारे या अनोख्या कवीचा रिकामटेकड्याचे आत्मवृत्त हा कविता संग्रह.. नगराजने जसे त्याच्या चित्रपटांमध्ये जब्या, आर्ची, परशा आणि झुंडमधली संपूर्ण टीम.. अशी सामान्य मुले घेऊन त्यांच्यातील असामान्य कलागुणांचा आविष्कार घडवून सर्वांना विस्मयचकित केले.. तसेच सांगली जिल्ह्यातील संग्राम बापू हजारे या फोटोग्राफर मधला अभिजात कवी हेरला आणि प्रसिद्धी पासून कोसो दूर असलेल्या या कवीला त्याच्या रिकामटेकड्याचे आत्मवृत्त या काव्यसंग्रहाच्या रुपाने प्रकाशात आणायचे ठरवले.. नागराजच्या आटपाट द्वारे लवकरच सांगलीला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे..
खालील प्रकाशचित्रांपैकी एका प्रकाशचित्रात नागराज आम्हाला संग्राम बापू हजारे यांच्या कविता तादात्म्य भावनेने वाचून दाखवतांना दिसत आहे.. दैनंदिन जीवनातील प्रतिमांच्या माध्यमातून व्यामिश्र अर्थविश्व निर्माण करणाऱ्या आणि अनोखे जीवनभाष्य करणाऱ्या हजारे यांच्या कवितांचे नागराजने केलेले अभिवाचन केवळ ग्रेट आणि अविस्मरणीय….नागराजचं हे सगळंच खूप म्हणजे खूपच थोर आहे, सुंदर आहे, महान आहे.. आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे सुखद अशा इंद्रधनुष्यी श्रावणसरी सारखा रसिक मनाला चिंब भिजवणारा आहे..
- प्रा. प्रदीप मोहिते यांच्या फेसबुकवरून