करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. यावेळी नरेंद्र ठाकुर उपस्थित होते. चव्हाण यांनी पत्रही दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरु होणे आवश्यक आहे. तीन वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. बारामती ऍग्रोबरोबर भाडेतत्वाने देण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र हा करार पूर्ण झाला नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळाला ओटीएस साठी परवानगी दिली. त्यानुसार ही प्रक्रिया झाली आहे.

संचालक मंडळाचीही मुदत संपली असून निवडणूक होईपर्यंत ऊस गाळप हंगाम सुरु होत आहे. या हंगामात कारखाना सुरु झाला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी योग्य प्रशासकाची नेमणूक करून राज्य व केंद्र सरकाच्या माध्यमातून कारखान्याला आर्थिक मदत करून कारखाना सुरु करावा, असे या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे.

