करमाळा (सोलापूर) : भिगवण ते टाकळी रस्त्यावर करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली चौकात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये वाळूसह ५ लाख ३० हजाराचा ट्रक जप्त करण्यात आला असून ट्र्क चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सतीश शंकर मंजुळे (वय ३१, रा. केत्तूर २, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसानी माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून शनिवारी (ता. ६) पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणामध्ये पोलिस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी फिर्याद दिली आहे. जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शनीवारी पहाटे कोंढारचिंचोली येथे जाणाऱ्या चौकात गस्त सुरु असताना एकजण बेकायदा वाळू वाहतूक करत आहे, अशी माहिती मिळाली. भिगवणकडून टाकळीकडे एका सहा चाकी ट्रकमध्ये चोरून वाळू वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली होती.

दरम्यान करमाळा पोलिसांनी कोंढारचिचोली गावात जाणाऱ्या चौकात नाकाबंदी केली. काही वेळातच भिगवणकडून टाकळीकडे जाणाऱ्या रोडने एक सहा चाकी ट्रक भरधाव वेगाने आला. त्याची शंका आल्याने पोलिस हेडकॉन्स्टेबल रणदिवे, पोलिस कॉन्स्टेबल लोंढे यांनी त्याला हाताने इशारा करून थांबवले. पोलिसांनी ट्रकमध्ये काय आहे हे पाहिले तेव्हा ट्रकमध्ये वाळू होती. या ट्रकचा चालक सतीश शंकर मंजुळे होता.
१४ वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू; साक्षी गेल्याचे समजताच पोथरे नाका येथील दुकाने बंद

संशयित आरोपी मंजुळे यांच्याकडे वाळूची रॉयल्टी पावती नव्हती. त्याने ट्रकमधील वाळू पुणे जिल्ह्यातील मलठण येथील भीमा नदीच्या पात्रातून चोरून आणली होती. याची खात्री झाल्यावर ट्रकसह वाळू जप्त करण्यात आली.

