सोलापूर :
राज्यातील रेल्वे मार्गावर घातपात घडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड होताना दिसत आहे. त्यातच सोलापूर- पुणे रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ९. 21 मिनिटाच्या सुमारास जिंती ते पारेवाडी रेल्वे स्थानका दरम्यानच्या रुळावर अनोळखी व्यक्तींनी मोठ- मोठे दगड ठेवून सोलापूरकडे येणाऱ्या केके एक्सप्रेसला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण चालकाच्या सतर्कतेमुळे होणारा हा अपघात टाळला.

दरम्यान गाडीवर बंदोबस्त अलर्ट असल्याने वेळीच त्या रेल्वे रुळावरील त्या ठिकाणचे दगड बाजूला काढून घेतले. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर पाच मिनिटांनी गाडी पुढे मार्गस्थ झाली. रेल्वे रुळावर आढळलेले दगड हे अपघात घडविण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

रेल्वे पोलिस घटनास्थळी भेट देऊन याचा तपास करीत आहेत. या प्रकरणी दौंड आरपीएफ येथे गुन्हा दाखल करून दगड कोणी ठेवले? याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटना मागे घातपात तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 28 ऑगस्टला डोंबिवली- ठाकुरली पाटोपाठ आता घातपात घडवणाऱ्या टोळीने आपला मोर्चा सोलापूरच्या रेल्वे रुळाकडे वळवला असल्याचे यातून दिसत आहे.
