करमाळा (सोलापूर) : बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची नुकतीच भेट घेतली आहे. ही भेट नेमकी का घेतली हे समजले नसून बागल यांनी या भेटीची छायाचित्रे टाकत फेसबुकवर ‘ग्रेट भेट’ असा उल्लेख केला आहे. ‘गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली, विविध विषयांवर चर्चा झाली’ असाही त्यांनी फेसबुकवर केला आहे.

बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचे फेसबुक अकाउंट व्हेरिफाय नाही. मात्र फेसबुकच्या माध्यमातून ते नागरिकांच्या संपर्कात असतात. सतत ते या पेजवर ऍक्टिव्ह असतात. त्याच अकाऊंटवरून त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, ‘ग्रेट भेट. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तरुण व अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल हाती घेताच सर्वत्र विकासकामांचा आलेख उत्तरोत्तर वाढत चालला आहे. विशेषतः एक तरुण, अभ्यासू, कणखर आणि मराठी माणूस या तख्तावर बसून जनतेसाठी सदैव उपलब्ध आहे, ही गोष्टच मनाला किती सुखावणारी आहे. मुख्यमंत्रीमहोदय, आपण जनकल्याणासाठी अहोरात्र करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, हे कार्य असेच सुरु राहो याच सदिच्छा.’

बागल यांनी त्यांच्या फेसबुकवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एका फोटोत बागल हे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोत आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्री सावंत यांच्याशेजारी बागल आहेत तर बाजूला बुके देताना दोन व्यक्त दिसत आहेत.
