मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सध्या भाजपचे मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या बारामती ऍग्रोचा अभ्यास सुरु असल्याचे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असे ट्विट केले होते. आता बारामती ऍग्रोबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा बारामती ऍग्रो हा शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देणारा कारखाना म्हणून ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून या कारखान्याला मोठ्याप्रमाणात ऊस गाळपासाठी जातो. काही दिवसातच ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. त्याची तयारी कारखान्यांकडून सुरु आहे. त्यातच भाजपचे कंबोज यांनी केले ट्विट चर्चेत आले आहे.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वार देण्याचा करार बारामती ऍग्रोबरोबर झाला होता. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच हा वाद न्यायालयात गेला होता. त्यावर आज (२२ ऑगस्ट) एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुसऱ्या एका सुनावणीवर शुक्रवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच कंबोज यांचे ट्विट चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील काही मंडळींनी भाजपचे नेते किरीट सोमय्या व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ऍड. पी. वाय. देशपांडे यांनीही आदिनाथबाबत चौकशी करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी याबाबत याचिकाही दाखल केली होती.
