करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातील एसटी बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पांडे येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पांडेजवळ करमाळ्याकडे येणाऱ्या एका एसटी बस चालकाला चौघांनी मारहाण केली. यामध्ये बसचालक महेश गौतम गरुड (वय 34, रा. पारेवाडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

बस चालक गरुड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी कर्तव्यावर असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मिरगव्हाण येथील प्रवासी सोडून पांडे येथे पांडे मार्गे करमाळा येथे येत असताना पांडेच्या पुढे करमाळ्याकडे येत असताना रस्त्यावर 300 ते 400 मेंढ्या चालत होत्या. म्हणून गाडी थांबवली होती. तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला एका मोटरसायकलवर गुन्हा दाखल झालेले चौघे उभे होते.

त्यातील एकजण म्हणाला, ‘तू विरुद्ध बाजूने तुझी गाडी घेऊन जा,’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘पुढून गाड्या येत आहेत. त्यामुळे मला जाता येत नाही,’ असे म्हणाल्यावर त्या चौघांनी चिडून मला शिवेगाळ केली. त्यानंतर तुझ्याकडे बघतोच आमचे ऐकत नाही असे म्हणून एसटी बसवर चढून स्टेरिंगवरून खाली ओढून मारहाण केली. तेव्हा वाहक किरण कांबळे यांनी सोडवासोडवी केली. शासकीय कर्तव्य करीत असताना मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. बुद्धम भोसले, सचिन पाडगिडे, तातू भोसले व भीमा भोसले (सर्व राहणार पांडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

