करमाळा (सोलापूर) : देवळाली ते जेऊर दरम्यान खडकेवाडी फाट्याजवळ एका दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कारने मागून जोराची धडक दिली. या अपघात एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणात अनोळखी चालकाविरुद्ध करमाळा पोलिसात १७ तारखेला गुन्हा दाखल झाला आहे. जखमी स्वाती महादेव मोरे (वय ४९, व्यवसाय निरूपणकार, रा. बावी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ७ तारखेला हा अपघात झाला होता.
जखमी मोरे या देवळाली येथील निरूपण बैठक झाल्यानंतर जेऊर रस्त्याने झरे येथे जात होत्या. साधना बबन गोसावी (रा. देवळाली) व जखमी मोरे या दोघी दुचाकीवर जात होत्या. तेव्हा खडकेवाडी फाट्याच्या अलीकडे मागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून मोरे यांच्या डोक्याला, पायाला व हाताला जखम झाली आहे. त्यांना करमाळा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना सोलापूर येथे हलवले होते. तेथून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.






