करमाळा (सोलापूर) : मतदारांना थेट त्यांच्याच हातात डिजिटल मतदान ओळखपत्र मिळावे म्हणून आता स्पीड पोस्टाने हे ओळखपत्र पाठवण्यात येणार आहे. करमाळा तालुक्यात याचे काम वेगात सुरु आहे. यामुळे ‘मला डिजिटल ओळखपत्र मिळालेच नाही’ अशा तक्रारी येणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला जात आहे. करमाळा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडून हे काम सुरु आहे. आतापर्यंत ९७५० नागरिकांची मतदान ओळखपत्रे आली आहेत.
नागरिकांना मतदान करताना मतदान ओळखपत्र लागते. याशिवाय अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणूननही मतदान ओळखपत्र ग्रह धरले जाते. निवडणूक आयोगाकडून आता मतदाराला डिजिटल मतदान ओळखपत्र दिले जात आहे. मात्र अनेक नागरिकांची ओळखपत्र मिळाले नसल्याची तक्रार येते. यावर उपाय म्हणून आता थेट स्पीड पोस्टाने हे ओळखपत्र देण्यात येत आहे. करमाळा तालुक्यात ९७५० नागरिकांचे डिजिटल मतदान ओळखपत्र आली आहेत.

निवडणूक विभागाकडून तयार होऊन आलेली डिजिटल मतदान ओळखपत्र नागरिकांना दिली जात आहेत. त्यापैकी साधारण ४ हजार ५०० मतदान ओळखपत्रे पोस्टाने पाठवली आहेत. राहिलेली मतदान ओळखपत्रे पाठवण्याचे काम सुरु आहे. आलेली सर्व ओळखपत्रे नागरिकांच्या थेट हातात मिळावीत व तक्रारी येऊच नयेत म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काम केले जात आहे. यापुढे सर्व ओळखपत्रे पोस्टानेचे पाठवली जातील. त्याचे काम वेगात सुरु आहे, असे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले आहे.

