करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल (गुरुवारी) रात्री पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर माजी आमदार निंबाळकर व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयांवर झाली याचे तपशील समजू शकले नाहीत मात्र यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम
काल खासदार निंबाळकर यांनी केम येथून दौरा सुरु केला होता. करमाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तेव्हा नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. त्यानंतर त्यांनी करमाळा शहरात नियोजित ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण, शंभूराजे जगताप, अमरजित साळुंखे आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक ऍड. अजित विघ्ने यांनी रेल्वे संदर्भात खासदार निंबाळकर यांच्याकडे निवेदन दिले.

पत्रकार परिषद सुरु असताना माजी आमदार पाटील यांचे आगमन झाले. दरम्यान खासदार निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यातील विविध कामांबाबत चर्चा केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आपण रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करत आहे. याबाबत गडकरी यांच्या एका व्हिडिओची क्लिक त्यांनी सर्वाना दाखवली. त्यानंतर माजी आमदार पाटील यांनी उजनीच्या पाण्यासंदर्भात चर्चा केली. करमाळा तालुक्याचा सर्व भाग ओलिताखाली कसा येईल. यावर त्यांनी काही मार्ग सांगितले. तेव्हा निंबाळकर यांनीही प्रश्न मार्गी लावण्याचे व पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा खासदार निंबाळकर यांनी माजी आमदार पाटील यांना आदिनाथबाबत विचारणा केली.

पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर तेथील उपस्थित भाजपचे पदाधिकारी व पत्रकार बाहेर आले. त्यानंतर माजी आमदार पाटील व खासदार निंबाळकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा नेमकी काय झाली हे समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे या चर्चेवेळी खासदार निंबाळकर यांनी माजी आमदार पाटील यांना थांबवून घेतले होते.
