मुंबई : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे यावर चर्चा केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी. डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल.