करमाळा (सोलापूर) : येथील तहसील कार्यालयात मदतनीस म्हणून कार्यरत असलेले रतिराज किसन जानराव (वय ३५) यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान त्यांचा सोलापूर येथे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपासून मेंदूवरील आजारासंबधी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र नियतीने मंगळवारी (ता. २७) त्यांना घेरले आणि अखेरचा श्वास घेतला. ते उत्तम खेळाडू व मनमिळावू होते. त्यामुळे तहसील सह करमाळा शहरात त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

जानराव यांनी शिवक्रांती संघात क्रिकेट खेळत असताना तालुक्यासह जिल्ह्यात गोलंदाजीच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला होता. गेल्या महिन्यात (ऑगस्ट) कार्यालयीन कामकाजादरम्यान चक्कर येऊन ते पडले होते. त्यानंतर त्यांना सोलापूर येथे तात्काळ दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्या मेंदूला सूज असल्याचे सांगितले होते. त्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही काळ तब्येतीत सुधारणा होत असल्याचे वाटत होते. परंतु नियतीने साथ न दिल्याने मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

