करमाळा (सोलापूर) : वेदांत- फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पामुळे झालेल्या नुकसानप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे करमाळा तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी केली आहे.
नलवडे यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना खनिकर्म क्षेत्रातील वेदांत व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची फाॅक्सकाॅनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे निश्चित झाले होते. प्रकल्पासाठी पुणे, तळेगाव येथे जागाही ठरली होती. मग शिंदे सरकार आल्याबरोबर कुठे माशी शिंकली आणि हा प्रकल्प थेट गुजरातला गेला असा प्रश्न महाराष्ट्रातील नागरिक विचारत आहेत.

दीड लाख कोटीची गुंतवणूक असणारा आणि लाखाच्या जवळपास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प होता. यामुळे पुन्हा एकदा राज्य औद्योगिक क्षेत्रात मागे पडले. हनुमान चालिसा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्र, भोंगे यातून तरूणांना रोजगार नाहीतर बेरोजगारी निर्माण होईल. हिंदुत्वाची गर्जना करून सण, उत्सव साजरे जरूर करा, पण त्यासोबत राज्यातील तरूणांच्या हाताला प्राधान्याने काम द्या, असे नलवडे यांनी म्हटले आहे.

