करमाळा (सोलापूर) : साधारण महिन्यापूर्वीच जेऊर- चिखलठाण रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र आता याच रस्त्याचा साईडपट्यावर चारी खोदण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. हा रस्ता खराब झाला तर पुन्हा मागचे दिवस येणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
करमाळा तालुक्यातील जेऊर- चिखलठाण रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना वाहने चालवणे अवघड झाले होते. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आंदोलने झाली होती. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालून निधी उपलब्ध करत रस्ता करून घेतला होता. महिन्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या एका खाजगी कंपनीच्या केबलसाठी चारी खोदण्याचे काम साईट पट्ट्यांवर सुरू झाल्याने हा रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काम तातडीने बंद करून खड्डे पडलेल्या साईट पट्टीवर पुन्हा व्यवस्थित मुरूम टाकून त्याची रोलिंग करून घेण्याची मागणी होत आहे.
अविनाश सरडे म्हणाले, जेऊर- चिखलठाण रस्त्याच्या साईट पट्ट्यावरून चारी खोदण्याचे काम सुरू असून हे बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा कार्यालयाच्या व अकलूज विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांच्याशी संपर्क साधून गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ते काय कारवाई करणार ते पहावे लागेल.