करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीची शुक्रवारी (ता. २६) ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत अतिशय महत्वाचे विषय घेतले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन सरपंच बळीराम काळे यांनी केले आहे. वडगावचे मांगी तलावामुळे पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळीचे तलावग्रस्थ ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली का नाही? यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे, हा विषय अतिशय महत्वाचा असून नागरिकांनी यामध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे काळे म्हणाले.
पुढे बोलताना सरपंच काळे म्हणाले, ‘नुकसान भरपाई मिळाली असेल तर त्याचे पुरावे आपण सरकार दरबारी मागु शकतो किंवा नसेल मिळाली तर पुनर्वसन कायद्यानुसार आपण आपला हक्क आता मागु शकतो. पुनर्वसनामुळे वडगाव दक्षिण वनविभागाच्या गट नं. 76 मध्ये बसवले गेले तर तो संपुर्ण गट गावठाण आहे का? या संदर्भात तहसीलदार करमाळा यांच्याकडे माहिती विचारून मिळत नसेल तर संपुर्ण गट नं. 76 गावठाण करण्यासंदर्भात ग्रामसभेत निर्णय घेऊन तशी जिल्हाधिकारी यांना विनंती करू शकतो.’

पुढे बोलताना काळे म्हणाले, ‘पुनर्वसन झालेल्या गावांना सरकारकडुन सार्वजनिक विकासकामे म्हणजेच शाळा, मंदिरे, रस्ते, गटारी, बागबगीचे व तत्सम सुविधा देणे गरजेचे असते ते दोन्ही वडगाव वासियांना मिळाल्या नाहीत. त्यावर चर्चा करून निर्णय घेणे व पुनर्वसन विभागाला यासंदर्भात निधी मागणे. तसेच ज्या कारणासाठी मांगी तलाव बांधण्यात आला तो सरकारचा उद्देश 20 वर्षांपासून तरी सफल होताना दिसत नाही. मांगी तलावाच्या पाणलोटक्षेत्र आवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने पाऊस कमी पडतो. कर्जत- करमाळा पाणलोटक्षेत्रातुन येणारे नदी, ओढे व नाले यावर बांधले गेलेले मोठमोठे बंधारे यामुळे मांगी तलावात क्षमतेएवढा पाणीसाठा होत नाही.

त्यामुळे आपण तलावग्रस्त विस्थापितांची व शेतकऱ्यांची मांगी तालावमुळे आसून अडचण नसून खोळंबा झाल्यासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे आपल्या होणाऱ्या ग्रामसभेमध्ये आपण आपल्या तलावाला कायमस्वरूपी पाणी किंवा आपल्या जमिनी परत आपल्याला मिळाव्यात, अशी विनंती जिल्हाधिकारी किंवा उच्चन्यायालय यांना करू शकतो. त्यामुळे दोन्ही वडगावचा सरपंच म्हणून ग्रामस्थ, मांगी तलावामुळे विस्थापित व मांगी तलावातील पाण्याचे लाभार्थी यांना शुक्रवारी ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
