सोलापूर : भारतात 19 व्या शतकात राजाराम मोहन राय यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ सुरू केली होती. महिलांचे स्वातंत्र्य विशेषत: विधवा पुनर्विवाह बाबत त्यांनी प्रखर विचार मांडले. महिलांच्या शिक्षणाबाबतही ते आग्रही होते. राजा राम मोहन राय हे आधुनिक भारताच्या सुधारणा चळवळीचे जनक होते. महिला सक्षमीकरणाचा मंत्र त्यांनी दिला व प्राचीन काळापासून महिलावर होत असलेल्या अन्यायाविरोध प्रखर विचार मांडून तत्कालीन समाजात महिलांच्या अधिकाराविषयी जागृती केली असल्याचे प्रतिपादन क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले.

आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 वी जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय सोलापूर व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली’च्या उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, डॉ. कविता मुरूमकर, तहसीलदार अंजली मरोड, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रा. श्रीकांत येळेगावंकर, माहिती व प्रसारण चे अंबादास यादव, हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक हणुमंत मोतीबणे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, पांडुरंग सुरवसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रकाश शिंदे, विद्यार्थी व ग्रंथालयाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, आपल्या देशात अशा महान विभुती जन्माला आल्या की ज्यांच्यामुळे जनमाणसाला विचाराची नवी दिशा मिळाली. त्यामुळे समाज बदलला, नवी शिकवण अंगीकारली, नव्याची कास धरली, स्त्रियांचा सन्मान व सहभाग वाढला या महान व्यक्तींपैकी एक थोर समाज सुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय होत. राजा राममोहन रॉय यांनी आधुनिक भारताची सुरुवात केली, त्यांच्या कार्यामुळे भारतात एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हंटले जाते.

अध्यक्षीय भाषणात माजी महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या की, महिलांनी स्वत:च्या पायावर ऊभे राहण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे. आज महिलांसाठी सर्व क्षेत्रे खुली असून प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करून दाखवत आहेत. महिलांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तयार असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून या जनजागृती रॅलीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
राजा राममोहन रॉय हे एक महान ऐतिहासीक विद्वान म्हणुन ओळखले जातात. अनादी कळापासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे कार्य केले. समाज परिवर्तनसाठी मोठे योगदान दिले. त्याकाळी महिला सक्षमीकरणाचे विचार त्यांनी आग्रहाने मांडले. रॉय यांनी सती प्रथेला विरोध केला. ही प्रथा कायद्याने बंद होईल म्हणून यशस्वी प्रयत्न याची माहिती डॉ. कविता मुरूमकर यांनी दिली. आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. या पिढीचे ग्रंथ वाचनाकडे दुर्लक्ष होत असून बुद्धीला अधिक चालना मिळण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार श्रीमती मरोड यांनी केले.
महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचा शुभारंभ क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ह्या रॅलीत हरिभाई देवकरण प्रशाला, सिध्देश्वर प्रशाला, निर्मलताई ठोकळ प्रशाला, ज्ञानप्रबोधीनी प्रशाला, बालवीर सार्वजनिक वाचनालय ग्रंथ दिंडी पथक, इत्यांदिंनी सहभाग नोंदवून चौका-चौकात प्रबोधनात्मक प्रात्यक्षिके करुन घोष फलकाव्दारे तसेच मुलींच्या झांज व ढोल पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हरिभाई देवकरण प्रशालेपासून मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडीसह रॅलीची सुरवात करण्यात आली. ही रॅली डफीरन चौक, महानगर पालिका, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक, निर्मलकुमार फडकूले सभागृह, सिध्देश्वर मंदिर, होम मैदान व पुन्हा हरिभाई देवकरण प्रशालेत समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदिप गाडे व ग्रंथालय कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले तर आभार ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी मानले.