करमाळा (सोलापूर) : कोरोनानंतर यावर्षी प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्सहात होत आहे. या उत्सहात सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात यावा. ‘डीजे’चा वापर टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी शुक्रवारी (ता. १९) केले आहे. करमाळा पोलिस ठाणे येथे पोलिस पाटील, मूर्ती कारागीर व डीजेचे मालक यांची बैठक घेतली.

पोलिस निरीक्षक कोकणे म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला प्राधान्य देण्यात यावे. उत्सवातून ध्वनी व जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मूर्तिकारांनी योग्य काळजी घ्यावी. पर्यावरणाची हानी होणार नाही हेही महत्वाचे आहे. त्यासाठी मूर्तीची उंचीही योग्य असावी, असे कोकणे म्हणाले.

मंडळांनी सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा. हुंडाबळी, बाल विवाह, कायदेविषयक जागृती, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम घ्यावेत. लोकहिताचे कार्यक्रम घेऊन आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
