करमाळा (सोलापूर) : तीन वर्षांपासून बंद असलेला तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरु होणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकरण न करता सर्वांनी मदत करण्याची आवश्यकता आहे, अशी स्पष्ट भूमिका श्री दत्तकला इन्स्टिट्यूटचे प्रा. रामदास झोळ यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना मांडली आहे. पवार यांच्याकडे हा कारखाना गेला असता तरी कारखाना सुरु करण्यासाठी मदत करणे हीच माजी व्यक्तिगत भूमिका राहिली असती, असेही प्रा. झोळ म्हणाले आहेत.

आदिनाथ कारखाना तीन वर्ष बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. करमाळा तालुक्यात आदिनाथ कारखान्यासह चार कारखाने आहेत. त्यातील आदिनाथ हा कारखाना शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून ओळखला जातो. सर्वात जास्त जवळ ऊस या कारखान्याच्या जवळ आहे. ऊस वाहतुकीच्या दृष्टीनेही हा कारखाना सोईचा समजला जातो. मात्र हा कारखाना बंद राहिल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी सर्वांनी मदत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रा. झोळ म्हणाले आहेत.

प्रा. झोळ म्हणाले, आदिनाथ बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले. हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर कारखान्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन मदत करण्याची आवश्यकता आहे. कारखाना सहकारी तत्वावर रहावा म्हणून मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी मदत केली आहे. आता कारखाना सुरु करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे. यावर्षी कारखाना सुरु व्हावा म्हणून देखभालीचे काम सुरु आहे. माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी पहाणी केली आहे.

पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन आदिनाथकडे पाहायला हवे. ज्यांनी आर्थिक मदत जाहीर केली होती. त्या सर्वानी आपली मदत जमा केली तर खूप मोठी मदत होणार आहे. याशिवाय कारखान्यावर आतापर्यंत ज्यांनी संचालक म्हणून काम पहिले आहे त्यांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला तर कारखाना सुरु करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे सांगतानाच आदिनाथ सुरु होणे ही माझी भूमिका आहे. बारामती ऍग्रोने जरी चालवला असता तरी कारखाना सुरु व्हावा हीच भूमिका होती, असेही ते म्हणाले आहेत.
कारखान्यात राजकारण करण्याची आता वेळ नाही. येणाऱ्या निवडणुकीत सर्व गटाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन हा कारखाना बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यावेळी कारखानचे चाक व्यवस्थित फिरले तर पुढे अनेक अडचणी दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आदिनाथ हे शेतकऱ्यांचे मंदिर आहे. त्यात चुकीचे कोणीही करू नये असेही ते म्हणाले आहेत. कारखाना सुरु झाला तर शेतकऱ्यांचा प्रश्न तर मिटेलच शिवाय अनेकांना त्यातून रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे यात राजकारण न करता सर्वानी एकत्र येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा प्रा. झोळ यांनी व्यक्त केली आहे.