करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदी परिसरात आज (शनिवार) सकाळपासून ड्रोनच्या घिरट्या सुरु आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी केली जात आहे. ड्रोनद्वारे कशाची टेहाळणी केली जात आहे याचे कोडे उलगडत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
सीना नदीवरील तरटगाव बंधारा, पांडुरंग वस्ती परिसर, पोटेगाव बंधारा व साळुंखे वस्ती परिसरात नागरिकांनी ड्रोनच्या घिरट्या पहिल्या आहेत. काही नागरिकांनी या ड्रोनचे रेकॉर्डिंग केले आहे. कशामुळे हे ड्रोन फिरत आहे हे समजत नसल्याने भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून कोळगाव धरणाची उंची वाढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचा सर्व्हे ड्रोनद्वारे केला जात असेल अशी चर्चा होती. मात्र ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा असा कोणताही सर्व्हे सुरु असल्याची आमच्याकडे माहिती नसल्याचे करमाळा पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
या भागातून अष्टीकडे जाणारी रेल्वेचा सर्व्हे काही दिवसांपूर्वी झाला होता. मग त्याचा पुन्हा ड्रोनद्वारे सर्व्हे सुरु आहे का? अशी चर्चा होती. त्याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशीही चर्चा झाली. मात्र अशा सर्व्हेची आमच्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. किंवा याबाबत आमच्याकडे माहितीही नसल्याचे सांगितले आहे. ड्रोनमुळे नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘ड्रोन उडवण्याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही. याबाबत त्वरित चौकशी केली जाईल’, असे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्पष्ट केले आहे. ड्रोनने कशाची टेहाळणी केली जात आहे? असा प्रश्न नागरिकांचा असून यामाध्यमातून दहशत निर्माण करून कोण चोरीचा तर प्रयत्न करत नाही ना? अशी चर्चा या भागात सुरु आहे.
दादासाहेब नलावडे म्हणाले, ‘काही वेळापूर्वी आमच्या शेतावरून ड्रोन गेला आहे. नेमका हा ड्रोन कशाचा आहे माहित नाही. अनेकजण शेतात राहतात. शेतकऱ्याची एक- एक वस्ती असते. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे’.