करमाळा (सोलापूर) : साडे येथील आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक दत्तात्रय जाधव यांनी शिंदे गटाला सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र अद्याप कोणत्या गटात प्रवेश करायचा हा निणर्य त्यांनी जाहीर केलेला नाही. दरम्यान त्यांनी शिंदे गट सोडू नये यासाठीही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असणार यांची चर्चा पंचायत समितीच्या आवारासह राजकीय वर्तुळात रंगत आहे.

जाधव यांनी शिंदे गट सोडायचा हा निर्णय झाला आहे असे दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरु झाली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे यांनीही यासाठी प्रयत्न केले असल्याचे समजत आहेत. त्यानंतर इतरही प्रमुख कार्यकर्त्यांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांच्या निर्णयाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा पंचायत समितीच्या आवारातही सध्या हीच चर्चा रंगत असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात ते प्रवेश करतील अशी चर्चा आहे. कारण पाटील गटाचे माजी सभापती शेखर गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची व त्यांची चांगली मैत्री आहे. त्यावरून ते पाटील गटात जातील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे.

दुसरीकडे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न होत असतानाच आज (गुरुवारी) शिंदे गटाचे कार्यकर्ते माजी महाराष्ट्र केसरी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रहास निमगिरे व ते एकत्र आले होते. फक्त एकत्रच आले नाहीत तर ते एका गाडीतच पंचायत समितीच्या आवारातून बाहेरही पडले. या गाडीचे सारस्थ्य निमगिरे यांनी केले. तर जाधव हे गाडीत मागच्या बाजूला बसले होते. त्यामुळे जाधव यांची निमगिरे हे शिंदे गट सोडू नयेत म्हणून मनधरणी तर करत नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे. का आणखी ते दुसरा काय निर्णय घेतला जाणारा यांची चर्चा रंगली आहे.
(बातमीत वापरलेले छयाचित्र काढण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना एकत्र बोलावले होते. छयाचित्र काढल्यानंतर ते दोघेही एकाच गाडीतून बाहेर पडले.)
