आदिवासी लेकींसाठी मदतीची हाक; ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी मदत

Educational assistance to girls in Padalne in Nagar district

अहमदनगर : आदिवासी भागातील मुलींच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर असतो. खडतर परिस्थितीत त्या प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण करतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्या जवळच्या गावात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते राम तळेकर यांनी मित्राच्या मदतीने मुलींना ड्रेस दिले आहेत.
मोठ्या आशेने भविष्य घडविण्यासाठी ग्रामीण भागातील मुली सज्ज असतात. अनेक संकटांना त्यांना सतत तोंड द्यावे लागते. सुरुवातीला पालकांना विश्वासात घेऊन पुढील शिक्षणाला त्या तयार करतात. वह्या, पुस्तके, कपडे, ऊन,वारा, पाऊस अशी अनेक संकटे झेलत त्या शिक्षण घेण्यासाठी सज्ज असतात. त्यांची जिद्द कमालीची असते. पण संघर्षाच बाळकडू त्यांना मिळालेलंच असतं म्हणूनच की काय त्या आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत तयार असतात.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाडाळणे (ता. अकोले) येथील आदिवासी ठाकर व कोळी समाजातील मुली शिक्षणासाठी राजूर व धामणगाव पाट येथील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये कधी पायी तर कधी खाजगी प्रवासी वाहतुकीचा जीवघेणा प्रवास करत असतात.

कोरोनाच्या प्रादूर्भावाने सगळ्यांचीच गणितं बिघडली. त्यांच्या शेतातील अन्न- धान्य, पीक उत्पादन कमी, बेरोजगारीचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला.

अनेक पालक आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यांना शिक्षणासाठी पाठवितात. त्या मुलींच्या कपड्याकडे पाहिले तर गलबलून येते. कोरोनामुळे व घरच्या गरिबीमुळे कपडे घेणे परवडत नाही. त्या फाटक्या कपड्यात शाळेत ये- जा करतात. हे पाहून खुप वाईट वाटते. या मुलींना काहीतरी मदत करावी, म्हणून सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी पाडाळणे येथील आदिवासी समाजातील नववी ते 12वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना ड्रेसचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राम तळेकर, बाळासाहेब सावंत, सरपंच पंढरीनाथ उघडे, पोलिस पाटील राजु तळेकर उपस्थित होते. नाशिक येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश चालीकवार, सुनील गीते, संजय हासे यांनी यासाठी मदत केली.

संपादन : अशोक मुरुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *