सोलापूर : रोजगार हमी योजनेमध्ये अमृत सरोवर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात 162 ठिकाणी पाझर तलाव दुरूस्तीचे काम सुरु आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 20 अमृत सरोवरवर 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांचा मुलगा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

अमृत सरोवर अभियान अंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशिला देशमुख, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी पंडित भोसले, मृद व जलसंधारण विभागाच्या श्रीमती रोंधे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल विपत उपस्थित होते. ऑनलाईनद्वारे संबंधित अधिकारी, अमृत सरोवरचे गावनिहाय संपर्क अधिकारी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, अमृत सरोवरअंतर्गत जिल्ह्यात कामे सुरू आहेत. आपल्या कामांचे जीओ टॅगिंग करून ती कामे पोर्टलवर अपलोड करावीत. मृद व जलसंधारण, जलसंधारण आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने जिल्ह्यात तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामांचे भूमीपूजन, लोकार्पण, झालेल्या कामांच्या ठिकाणी 15 ऑगस्टला वृक्षारोपण करावे. यासाठी संबंधित गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांना निमंत्रित करावे. तिन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे.

अमृत सरोवर अंतर्गत जलसंधारण अधिकारी (जिल्हा परिषद) : 42 कामे, मृद व जलसंधारण : 36 कामे आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 84 कामे अशी 162 ठिकाणी जलसंधारणाची कामे सुरू असून त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुका : सांगवी, चपळगाव, सुलेरजवळगे. बार्शी तालुका : मालवंडी. माढा तालुका : अकोले, तुळशी. माळशिरस तालुका : भांब, तरंगफळ, बचेरी. मंगळवेढा तालुका : हुलजंती, बावची. पंढरपूर तालुका : कोंढारकी, मेंढापूर. सांगोला तालुका : जवळा, किडबिसरी आणि जुनोनी. उत्तर सोलापूर तालुका : हिरज आणि दक्षिण सोलापूर तालुका : चिंचोळी, नांदणी आणि वळसंग.
हॉटेल मालक, भिगवण पोलिसांचे प्रसंगावधान ठरले करमाळाच्या ‘तिच्या’साठी सुरक्षादुत

