करमाळा तालुक्यात पक्षापेक्षा गटाचे राजकारण नेहमीच चालत आलेले आहे. पण हे राजकारण विसरून जगताप, पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते कर्मवीर अण्णासाहेब जगताप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. तालुक्यातील प्रमुख गटांसह राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेही या मंडळात आहेत. फक्त गणेशोत्सवच नाही तर वर्षभर विविध उपक्रम हे मंडळ राबवत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने राजकारणविरहित ही मंडळी काम करत आहे.
करमाळा शहरात १६ वर्षांपूर्वी कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांचे नातू ऍड. शिवराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाची स्थापना झाली. क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या मंडळातील सदस्य एकत्र आले. त्यातून त्यांनी खेळाचा आनंद घेत सामाजिक कार्यात सहभाग घेऊन खेळाडू तयार व्हावेत म्हणून प्रोत्साहन दिले. याबरोबर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला. याशिवाय मंडळाने सामाजिक काम करत असताना गरजुंना गृहउपयोगी साहित्य दिले.

कोरोना काळात या मंडळाने केलेले काम उल्लेखनीय आहे. मंडळातील सदस्यांनी एसटी स्टँडवर अडचणीत सापडलेल्या व्यक्तीची जेवणाची व्यवस्था केली आहे. प्रवासाच्या साधनाअभावी अडकून पडलेल्या व्यक्तींना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला आहे. करियर मार्गदर्शन, व्याख्यान, स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन असे कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेतले जातात.

करिअर गाईडन्स शिबीर, कोविड काळात धान्य वाटप, महिलांना साडी वाटप, क्रिकेट स्पर्धा, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन, मुलींना गणवेश वाटप, प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मूकबधिर शाळा खाऊ वाटप असे सामाजिक उपक्रम या मंडळाने घेतले आहेत.

ऍड. जगताप यांच्यासह आझाद शेख, राजू सय्यद, किरण बोकन, मधुकर भुजबळ, आंनद जगदाळे, इरफान बागवान, काळू बुधकर, अंकुश पिसे, संतोष शितोळे, शेखर स्वामी, नजर कुरेशी, राहुल रेगुडे, अशोक सरडे, सादिक शेख, जावेद शेख, राजू फंड, खलील शेख, दिलीप जाधव, प्राजूत गांधी, समीर शेख, नागेश राखुंडे, ऍड. शिवराज शेरे, अंगद देवकाते, नरेंद्र ठाकूर, शिवनाथ घोलप, आदित्य जगताप, अरुण टांगडे, ओम शेरे, बाळासाहेब जगताप, मुस्तफा घोडके, युसूफ शेख, पप्पू शेख, रमेश कांबळे, शंभू मेरुकर, पंकज परदेशी हे या मंडळात कार्यकर्त आहेत.