Video : विधानसभेवरून पाटील व बागल यांच्यात प्रश्न- उत्तरे! शेवटच्या क्षणामुळे गाजली ‘आदिनाथ’ची सर्वसाधारण सभा

Former MLA Narayan Patil and Rashmi Bagal together in the general meeting of Shree Adinath Sahakari Sugar Factory

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे एकाच मंचावर शुक्रवारी (ता. ३०) एकत्र आले. तीन वर्ष बंद राहीलेला आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला सारून मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार त्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेवटच्याक्षणी थेट सभेतच त्यांच्यात एकमेकांमध्ये प्रश्न- उत्तरे झाली. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष धंनजय डोंगरे यांनी ‘हे राजकीय व्यासपीठ नाही’ असे म्हणत दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माजी आमदार पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत भाषण आवरते घेतले. दरम्यान रश्मी बागल यांच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे नाराजी दिसून आली. तेव्हा दिग्विजय बागल उपस्थित नव्हते.

(नेमके काय झालं पहा व्हिडिओ. शांत वातावरणात हा व्हिडिओ पहा. तेथील व्यवस्थेमुळे आवाज असा येत आहे. आम्ही फक्त तेथील घडामोड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.)

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार पाटील व बागल गटाचे नेत्या बागल यांच्यातील प्रश्न उत्तराने शेवटच्याक्षणी चांगलीच गाजली. कारखाना सुरु करण्यासाठी दोघेही एकत्र आले असल्याचे पाहून उपस्थितांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले होते. एकेक करत करत सर्वांनी जाहीरपणे मुद्दे मांडले. त्याला उत्तरेही देण्यात आली. सभेमध्ये सुरुवातील कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी विषय मांडले. त्यानंतर ऍड. शशिकांत नरुटे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, राजभाऊ कदम, महेंद्र पाटील, प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी मुद्दे मांडले.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांना संचालक म्हणून घेण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पाटील यांनी मला अधिकार किंवा संचालक पद नको तर निवडणुकीत विजयी करा, असे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर कारखान्याच्या संचालिका बागल यांनी मनोगत व्यक्त करत कारखान्याची परिस्थिती सर्वांसमोर सांगितली. ‘आमदारकी, पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुकीचा विचार न कराता आम्ही केवळ आदिनाथसाठी एकत्र काम करणार आहोत’, असेही बागल यांनी सांगितले. त्यानंतर प्राचार्य रामदास झोळ यांनी मनोगत व्यक्त केले.

बागल व पाटील यांच्यात नेमके काय झाले?
शेवटी माजी आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आदिनाथ ज्यांच्या- ज्यांच्या ताब्यात आला त्यांनी व्यवस्थित कारखाना चालवला असता तर ही वेळ आली नसती. आदिनाथला व्यवस्थित चालवायचा असेल तर भविष्यात चांगल्या माणसाच्या ताब्यात द्या, असे आवाहन त्यांनी केले. हे आवाहन झाल्यानंतर बागल व पाटील हे एकत्र कसे आले हे पाटील यांनी सुरु केले. तेव्हा पाटील यांनी बागल यांना आपण कसे एकत्र आलो हे सांगा असे सांगितले.

त्यावर बागल म्हणाल्या, ‘कारखाना सुरु करण्यासाठी एकत्र आलो आहोत. याशिवाय कोणताही विषय झालेला नाही. तुम्ही दोघे कारखान्यासाठी एकत्र काम करा, असे मंत्री सावंत यांनी सांगितले आहे. याशिवाय बाकीचा कोणताही विषय झालेला नाही’, असे बागल यांनी सांगितले. त्यावर माजी आमदार पाटील बागल यांच्याकडे पहात म्हणाले, पुढचा विषय काय झाला आहे मी सांगू का? त्यावर बागल त्यांना होय असे म्हणाल्या. माजी आमदार पाटील हे बोलायला लागताच पुन्हा बागल उभा राहिल्या आणि आदिनाथमध्ये राजकारण करायचे नाही, असे ठरले असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा माजी आमदार पाटील यांनी बोलायला सुरु केले आणि ‘विधानसभेला तुम्ही मला सहकार्य करणार आहात ना? असे ठरलं आहे ना?’ असे विचारले. त्यावर बागल पुन्हा उभा राहिल्या आणि विधानसभेचे काहीही ठरलेले नाही असे म्हणाल्या. त्यानंतर समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून आवाज आला आबा तुम्हीच सांगा काय ठरली ते? त्यावर पुन्हा माजी आमदार पाटील बोलायला लागले तेव्हा त्यांनी सांगितले विधानसभेला तुम्ही मला मदत करणार आहेत ना? त्यानंतर पुन्हा जागेवर बसूनच बागल यांनी असं काही ठरलेले नाही. सावंत साहेब येथे येऊन निर्णय सांगणार आहेत. हे राजकीय स्टेज नाही. कारखान्याची सभा आहे. कारखान्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे सांगितले. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष डोंगरे यांनी यामध्ये मध्यस्ती केली आणि हे राजकीय व्यासपीठ नाही असे म्हणत समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुन्हा पाटील यांनी तुम्ही (बागल) स्पष्टपणे सांगत नाहीत म्हणून मी सांगितले. यातून तुम्हाला काय वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे पाटील म्हणाले.

हा प्रकार झाला तेव्हा दिग्विजय बागल उपस्थित नव्हते. सभेवेळी तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख देवानंद बागल, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, प्राचार्य जयप्रकाश बिले, माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्व कांबळे, बागल गटाचे हरिशचंद्र झिंजाडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, अॅड. पी. वाय. देशपांडे, प्रा. रामदास झोळ, सावंत गटाचे सुनिल सावंत, महेंद्र पाटील, संचालक रमेश कांबळे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *