करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून न्यायालयीन लढाई सुरु असताना आता राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. ‘ओटीएस’मुळे बारामती ऍग्रो न्यायालयात गेले असल्याने उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या पाटोपाठ आता माजी आमदार नारायण पाटील गटानेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा बारामती अॅग्रोबरोबर भाडे करार झालेला असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी) आदिनाथ कारखान्यास ओटीएससाठी पत्र देणे चूक आहे. या विरोधात आपण न्यायालयात गेलो असल्याचे बारामतीचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी जाहीर केले. यावर पाटील गटाकडून टीका केली जात आहे. पाटील गटाकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे.

यामध्ये पाटील गटाचे सूनील तळेकर यांनी म्हटले आहे की, ‘आदिनाथचा कारभार गुळवे यांनी सुद्धा पाहीला आहे. परंतू आता केवळ बारामती अॅग्रोने कोणतीही निवडणूक न लढवता त्यांना थेट पद दिले असून या पदावर राहून बारामतीकरांवरील निष्ठा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गुळवे हे सभासदांच्या नुकसाची चिंता करत आहेत. करार होऊनही तीन वर्षे आदिनाथ बंद अवस्थेत होता. त्यामुळे सभासद व कामगारांचे झालेले नुकसान त्यांना दिसले नाही का?’ असा प्रश्न तळेकर यांनी केला आहे.


तळेकर म्हणाले, ‘५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर शेकडो कोटीहून अधिक कोटी स्थावर मालमत्ता असलेल्या आदिनाथचा भाडेपट्टी करार करुन घेताना सभासदांवर सत्तेच्या जोरावर केला गेलेला अन्याय गुळवे यांना दिसला नाही का? सहकारक्षेत्रात जास्तीत जास्त १५ वर्षे कारखाना भाडेपट्टी करारावर देण्याची नियमित पद्धत बाजूला सारून थेट २५ वर्षाचा भाडेपट्टी करार करुन घेताना गुळवे यांना आपण सभासदांचा मालकी हक्क जादा काळासाठी हिरावून घेत असल्याची खंत वाटली नाही का?’ असे प्रश्न त्यांनी गुळवे यांना केले आहेत.



‘साखर विक्री करुन आदिनाथने स्वाभीमानाने बँकेचे कर्ज फेडले आहे. आदिनाथ हा सुरुवातीस भाडेपट्टी करार करुन व भविष्यात थेट लिलाव करुन विकत घ्यायचा डाव फसल्यानेच आता गुळवे हे न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आता सहकारतत्वावर आदिनाथ सुरु होण्यास आडकाठी आणायची व सभासदांचे आणखी नुकसान करायचे या मानसिकतेतूनच हा सगळा प्रकार आहे,’ असा आरोप तळेकर यांनी केला आहे. ‘गुळवे यांनी कितीही कायदेशीर आडकाठी आणायची ठरवली तरी काही उपयोग होणार नाही. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावरच चालणार असून या कारखान्यास गतवैभव मिळवून देण्यासाठी सक्षम आहेत,’ असा ठाम विश्वास तळेकर यांनी व्यक्त केला.
– ‘आदिनाथ’ सुरू करण्यासाठी पवारांनी १० कोटी डिपॉझिट करून मदत करावी; गुळवे यांच्यावर टीका करत चिवटे यांचे आमदार रोहित पवारांना आवाहन
– ‘आदिनाथ’साठी आता बारामती ऍग्रो न्यायालयात; पुढील सुनावणी आता…