करमाळा (सोलापूर) : पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. २०१४ मध्ये त्यांनी आमदार झाल्यापासून चांगले काम केले. रस्ते, वीज, आरोग्य व सिंचनाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले, असे जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे.
खांबेवाडी येथे जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. बोरगाव येथील संजय पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, संदीप गायकवाड, पांडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब मोटे, माजी उपसरपंच भिवा वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, उपसरपंच आदिनाथ शिंदे, शिवाजी नरुटे, पोलिस पाटील अनिल देवकते, ग्रामपंचायत सदस्य शहाजी शिंदे, आबासाहेब टकले, रामभाऊ शिंदे, महेंद्र शिंदे, आप्पा शिंदे, तात्या शिंदे, सुशील नरुटे आदी उपस्थित होते.
जेऊरचे सरपंच पाटील म्हणाले, खांबेवाडी विकासापासून वंचित राहू देणार नाही. 2014 च्या निवडणुकीमध्ये करमाळा मतदारसंघातील मतदारांनी नारायण पाटील यांना आमदार केले. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. दहिगाव उपसा सिंचन योजना त्यांनी सुरू केली. कुकडीमधून करमाळा तालुक्याला 18 आवर्तने मिळवून दिली. करमाळा तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न माजी आमदार पाटील यांनी सोडवला. जेऊर बस स्थानकाला माजी आमदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला. जिल्हा उपरुग्णालय येथे 80 बेडचे आधुनिक सुसज्ज असं हॉस्पिटल उभा केले.
मांगी तलावातून कॅनलद्वारे १७ गावांना पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोळगाव धरणामधून उपसा सिंचन मार्फत पूर्व भागाला पाणी मिळवून दिले. करमाळा तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न गंभीर होता परंतु त्यांच्यामुळे विजेचा प्रश्न मिटला, असे त्यांनी सांगितले आहे. सतीश नरुटे यांनी आभार व्यक्त केले.