करमाळा (सोलापूर) : कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातोय. करमाळा शहर व तालुक्यातही गणपती बाप्पाचं स्वागत वाजत गाजत करण्यात आले. गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. सकाळपासूनच खरेदीसाठी भक्तांनी शहरातील बाराजपेठेत गर्दी केली होती. यामध्ये चिमुकलेही मोठ्याप्रमाणात होते. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी मेन रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला होता.

करमाळ्यात मंडळांनी व गणेशभक्तांनी गणेश चतुर्थी निमित्त आज (बुधवारी) सार्वजनिक ठिकाणी व आपापल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. दुपारनंतर करमाळा शहरात पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याबरोबर लाडक्या गणरायाचे पुन्हा वाजत गाजत आगमन करण्यात आले. सावंत गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ यांच्या वतीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गजानन स्पोर्ट क्लब, नंदन प्रतिष्ठान, राजमाता अहिल्यादेवी हिंदू खाटीक मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, किंग्ज ग्रुप, वाल्मिकी मित्र मंडळ, सरकार मित्रमंडळ, राशीन पेठ मित्र मंडळ, दत्त पेठ मित्र मंडळ, जय महाराष्ट मित्र मंडळ आदी मंडळाच्या वतीने करमाळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रतिष्ठापना केली जात आहे.
करमाळा शहर व तालुक्यात ७९ मंडळांना ऑनलाईन परवाना देण्यात आला आहे. सुमारे १२६ गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यांनाही परवाना दिला जाणार आहे. गणेशोत्सव निमित्त काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी केले आहे.