करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून सध्या आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. माजी आमदार नारायण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रश्नाला बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना उत्तर दिले आहे. ‘केवळ मंत्री तानाजी सावंत यांच्या कारखान्याला फायदा व्हावा म्हणून पाटील यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरु आहेत’ असे म्हणत ‘सावंत यांच्या कारखान्याने आधीचे शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत का?’ असा थेट प्रतिप्रश्न गुळवे यांनी केला आहे. ६ जुलैला आम्हाला कारखान्याचा ताबा घेऊन दिला असता तर आम्ही याचवर्षी कारखाना सुरु केला असता, परंतु सावंत यांच्या माध्यमातून पाटील यांनी अडथळा निर्माण केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
आदिनाथची सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. यामध्ये या वर्षी कारखाना सुरु होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती ऍग्रोही आता न्यायालयात गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाटील गटाचे सुनील तळेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी टीका केली होती. यावेळी करण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे देत प्रति प्रश्न केले आहेत.

उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६ जुलैला आम्ही भाडेतत्वाची रीतसर प्रक्रिया करून ताबा घेण्यासाठी गेलो. तेव्हा माजी आमदार पाटील यांनी अडथळा आणला. जर तेव्हा ताबा मिळाला असता तर आतापर्यंत आम्ही मेटन्सचे काम सुरु करून कारखाना सुरु केला असता. पण राज्यात सत्ता बदल होताच पाटील यांनी सावंत यांच्या माध्यमातून यात अडथळा निर्माण केला. यातून शेतकऱ्यांचे हित होणार नाही. सावंत यांच्या कारखान्याची काय परिस्थिती आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. त्यांचा ऊसाचा दर काय? बिलाची स्थिती काय? हेही पाहण्याची गरज आहे.’

‘पवार यांच्या बारामती ऍग्रोने नेहमीच शेतकऱ्यांचे हित पहिले आहे. तालुक्यातील कारखान्यापेक्षा जास्त दर दिलेला आहे. बिलाची कधीही अडचण नाही. तेच धोरण आदिनाथबाबतही असणार आहे. आदिनाथ बारामती ऍग्रोने सुरु केला तर तालुक्यातील कारखानदारी अडचणीत येऊ शकते. त्यामुळेच सावंत यांनी माजी आमदार पाटील यांचा वापर सुरु केला’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आदिनाथवर बागल यांची सत्ता असताना पाटील पुढे झाले आहेत म्हणजे त्यांना अधिकार दिले जाणार आहेत का?’ असा प्रश्नही गुळवे यांनी केला आहे.

तीन वर्ष करार होऊन कारखाना सुरु का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना गुळवे म्हणाले, ‘कारखान्याचा करार हा तीन वर्षांपूर्वी झालेला नाही. तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्या दूर झाल्यानंतर म्हणजे मे २०२२ मध्ये करार झाला आहे. तोपर्यंत कारखाना आमच्याकडे आलेला नव्हता. मे महिन्यात करार झाला तेव्हा एक वर्षाचे भाडे ३ कोटी रुपये आम्ही भरले आहेत. हा करार होत असताना न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली. बँकेने आमच्याकडून पैसे घेतले आणि कारखान्याला ओटीएसला पत्र दिले. ही पद्धत चुकीची आहे. आम्ही त्याविरुद्ध न्यायालयात गेलो आहोत. बँकेने माहिती दिली नाही, असा आमचा आरोप आहे’, असेही गुळवे म्हणाले आहेत.
– माजी आमदार पाटील गटाचाही आता ‘आदिनाथ’वरून गुळवे यांच्यावर निशाणा
– ‘आदिनाथ’ सुरू करण्यासाठी पवारांनी १० कोटी डिपॉझिट करून मदत करावी; गुळवे यांच्यावर टीका करत चिवटे यांचे आमदार रोहित पवारांना आवाहन
– ‘आदिनाथ’साठी आता बारामती ऍग्रो न्यायालयात; पुढील सुनावणी आता…
– ‘आदिनाथ’साठी साडेपाच कोटी भरले! सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष